User:Yadav Tarte Patil/sandbox

From Wikipedia, the free encyclopedia

कारंजा सोहोळ अभयारण्य, कारंजा जि.वाशीम, महाराष्ट्र राज्य


जंगल शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर एक आकृती उभी राहते. घनदाट झाडांचा समूह म्हणजे जंगल हे चित्र घर करू लागतं. मात्र जगात २१, भारतात १६ व महाराष्ट्रात एकूण ७ मुख्य जंगलांचे प्रकार आहेत. केवळ घनदाट परिसर म्हणजेच जंगल इतकी मर्यादित व्याख्या न राहता ही अधिक व्यापक संकल्पना आणि त्यातील वास्तव आपल्या लक्षात येते. सदाहरीत, निमसदाहरित, शुष्क पानगळी, आर्द्र पानगळी, तिवराच्या जंगलासह काटेरी खुरटी व गवती कुरण हा एक महत्वपूर्ण प्रकार आहे. माळरान असाही एक पर्यायी शब्द आपल्या अंगळवणी पडलाय. घनदाट जंगल आणि माळरान हे दोन्ही स्वतंत्र अधिवास आहेत. काही समान तर काही त्या त्या अधिवासात राहणाऱ्या प्रजातीहून आपण यांचे वेगळेपण निश्चितपणे सांगू शकतो. एकंदरीत अश्या स्वतंत्र अधिवासात फिरण्याचा अन निरीक्षण करण्याचा एक वेगळा आनंद आहे. म्हणूनच अश्या वेगवेगळ्या अधिवासात आपण भटकत राहिल पाहिजे.

एकेकाळी चिता मांजरवर्गीय प्राण्याने अधिराज्य गाजविलेला प्रदेश म्हणजे कारंजा सोहोळचा परिसर होय. मात्र हाच परिसर आज काळवीटांसाठी राखीव अभयारण्य म्हणून परिचित आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात वसलेल्या कारंजा सोहोळ काळवीट अभयारण्याची निर्मिती दि.१२ जुलै २००० मध्ये करण्यात आली. मुळात शेती व शहरानजीकच्या शेतजमिनीवर हुंदडणाऱ्या काळविटांना हक्काचे आश्रयस्थान देण्याच्या उद्देशाने या अभयारण्याची निर्मित करण्यात आली. कारंजा वनपरिक्षेत्रातील कारंजा, गिर्डा, दादगाव व सोमठाणा या नियतक्षेत्रातील १८.३२ चौ.किमी वनक्षेत्राचा या अभयारण्यात समावेश करण्यात आला. कारंजा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य वसलेले आहे. या अभयारण्याच्या दक्षिण दिशेने अडाण नदी वाहते. पूर्वेकडून यवतमाळ जिल्ह्याची सीमा आहे. पश्चिमेस मंगरुळपीर तालुका असून हे अभयारण्य अजिंठा डोंगराच्या परिसरात वसलेले आहे. खर म्हणजे अडाण नदी आणि तिचे पाणी या अभयारण्याचा प्राण आहे. काटेरी खुरट्या प्रकारच्या या वनात हिवर, खैर, भाराटी, बोर. पळस व इतर झुडूपी वनस्पती आहे. गवती कुरण येथील खास वैशिष्ठ्य आहे. येथे काळविटांसह नीलगाय, रानडुक्कर, बिबळ्या, तडस, कोल्हा, रानमांजर, ससा, सायाळ, मुंगूस, उदमांजर यांचा वावर आहे. मैना, भोरी, तितर, लावा, माळटिटवी, दयाळ, सोनपाठी सुतार, मराठा सुतार, कोतवाल, खाटीक, चंडोल या रानपक्ष्यासह चमचचोच्या, चित्रबलाक, अवाक, बगळा, राजहंस, मुग्धबलाक यांच्याश १४५ हून पक्ष्यांचे दर्शन घडते. गवती कुरण असल्याने येथे किटकांची संख्याही अधिक आहे. फुलपाखरे व विविधरंगी नाकतोडे येथे भरपूर संख्येने असून नाकतोड्यांची विविधता अधिक आहे.

कारंजा सोहोळ अभयारण्य हे गवताळ असून दाट जंगल नसल्याने येथे नीलगाय व काळविटांचे कळप आढळतात. निलगायीच्या मखरीहून येथील निलगायींच्या संखेची आपण कल्पना करू शकतो. मात्र येथील काळविटांची संख्या घटत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गिर्डा परिसर वगळता या अभयारण्यात फारसा प्राण नसल्याचे दिसून येते. मोठ्या प्रमाणात गुरेचराई आणि मोळ्यासाठी झुडुपांची होणारी कत्तल पाहून मन विषण्ण होते. इतकच काय तर नदीच्या पात्रात काळवीट फसून गावठी कुत्र्यांनी शिकार केल्याच्या घटनाही घडत असल्याचे स्थानिक लोक सांगतात. केवळ गिर्डा परिसर वनपर्यटनासाठी फिरण्याजोगा असून तिथे काळवीट अन निलगायीचे आरामात दर्शन होते. गिर्डा परिसराचा लहानसा भाग वगळता हा माळरान परिसर अभयारण्य नसल्याचाच भास होतो. सन २०१६ मध्ये मी व तत्कालीन उपविभागीय वनाधिकारी श्री.राहून गवई व वनपरिक्षेत्र अधिकारी श्री डोंगरे व चमूसह आम्ही काही दिवस शिकार रोखण्यासाठी प्रयत्न केले. रात्रीच्या वेळी जंगल गस्त तसेच आजूबाजूच्या गावांमधील आठवडी बाजारात जाऊन वन्यप्राण्यांची विक्री होते का याचीही पाहनी केली. स्थानिक गावांना भेटीही दिल्या. गिर्डा सारख्या गावकऱ्यांच्या उत्साह अतिशय चांगला दिसून आला. मात्र येथे अधिक लोकाभिमुख होऊन गावकऱ्यांच्या मनात संवेदना जागृत करण्याची गरज आहे. कारंजा सोहोळ अभयारण्यास भेट देण्यासाठी अकोला विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) वन्यजीव विभाग किंवा वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) कारंजा यांच्याशी संपर्क साधावा. नीलगायींचा मुक्त संचार असलेले अभयारण्य तसेच पक्ष्यांच्या अधिवास असलेला ऋषी तलाव आणि कारंजाचे गुरू मंदिर असा तिहेरी संगम या सहलीत साधता येतो. सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा लाभलेल्या कारंजा व वत्सगुल्म नगरीची कारंजा सोहोळ अभयारण्य हा खऱ्या अर्थाने आज मानबिंदू ठरतो आहे.

@ यादव तरटे पाटील, दिशा फाउंडेशन, अमरावती

www.yadavtartepatil.com