Jump to content

User:Santoshdesh

From Wikipedia, the free encyclopedia
                                        माझी (माय) मराठी  
                                                                      प्रा.डॉ.संतोष देशमुख                                                                                                                            
                                                            मराठी विभाग,लोकसेवा महाविद्यालय,औरंगाबाद.महाराष्ट्र 


२७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.२७ फेब्रुवारीच का?तर हा मराठी साहित्याचा मानदंड असणाऱ्या कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस.कुसुमाग्रज एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी,नाटककार व कादंबरीकार.जीवनलहरी,किनारा,मराठी माती,वादळवेल इ.त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह आहेत.’विशाखा’हा काव्यसंग्रह तर आधुनिक मराठी काव्याचे भूषण आहे.मराठी साहित्याला दुसरे ज्ञानपीठ प्राप्त करून देणारे कुसुमाग्रज या मातीत जन्मले हे या मातीचे भाग्यच आहे. कुसुमाग्रजांनी शेवटच्या क्षणापर्यंत मराठी भाषेची सेवा केली आहे.मराठी भाषादिनाच्या निमित्ताने त्यांचा ‘पन्नाशीची उमर गाठली,अभिवादन मज करू नका,मीच विनविते हात जोडूनी,वाट वाकडी धरू नका’हा फटका आठवतो. मराठी भाषेची झालेली दैन्यावस्था कुसुमाग्रजांनी या फटक्यातून मांडली.त्यांनी मराठी भाषेची केलेली सेवा व तळमळीचे महत्व लक्षात घेऊन त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो.

            मराठी भाषादिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. या दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांची,उपक्रमांची रेलचेल पहायला मिळते.आजची मराठीची अवस्था पाहून भाषा नष्ठ होते कि काय?या भीतीपोटीच आपण मराठी भाषेच्या संवर्धनाविषयी जागरूक झालो आहोत. “जननी जन्मभूमिस्य स्वर्गादपि गरियसी”! याचा अर्थ असा होतो की जननी म्हणजे आई आणि जन्मभूमी हे  निसर्गाने बहाल केलेले वैभव आहे.अशाच प्रकारे मातृभाषा हे देखील आपले वैभवच आहे. आपल्या मातृभाषा मराठीला फार मोठी परंपरा आहे.मराठी हि इंडो- युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक भाषा आहे.मराठी ही गोवा आणि महाराष्ट्र ह्या राज्यांची अधिकृत राजभाषा आहे.मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे.९ व्या शतकांपासून प्रचलित असणाऱ्या मराठी बोलणाऱ्यांची संख्या ९ कोटीच्या आसपास आहे.मराठी भाषेची निर्मिती संस्कृतमधून निर्माण झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. मराठी भाषेचा आरंभ शोधताना इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंत मराठी भाषेची चिन्हे पहायला मिळतात.मराठी भाषा ही प्राचीन,समृद्ध आणि गौरवशाली परंपरा असलेली भाषा आहे.सातवाहन,राष्ट्रकुट तसेच अनेक मराठी राजांनी मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिला.मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या खुणा दोन ते अडीच हजार वर्षांपर्यंत मागे नेता येतात. मराठीच्या  अडीच हजार वर्षाच्या वाटचालीत अनेक संतांनी,कलावंतांनी,साहित्यिकांनी,संशोधकांनी तसेच दैनंदिन व्यवहारात मराठी भाषा बोलणाऱ्या,लिहिणाऱ्या,वाचणाऱ्या मराठी माणसांनीही मराठी भाषा समृद्ध करण्यात अमूल्य योगदान दिलेले आढळते.
          उपलब्ध ग्रंथाच्या आधारे मराठी साहित्याच्या इतिहासाचा आरंभ यादवकाळात होतो.सातवाहन ते यादव हा जसा राजवटीमधल्या बदलाचा काळ आहे तसाच महाराष्ट्री-प्राकृत, महाराष्ट्री-अपभ्रंश मराठी हा भाषिक परिवर्तनाचाही काळ आहे. मराठी साहित्याचा मागोवा घेताना केवळ राजवटीचा इतिहास उपयोगाचा नाही.राजवटीबरोबरच संप्रदाय आणि ग्रंथ यांचाही विचार करावा लागतो.मराठीतल्या आरंभकाळातल्या साहित्याला विविध उपासना पंथांनी प्रेरणा दिलेली आहे.त्यातला सर्वात महत्वाचा पंथ म्हणजे नाथपंथ होय.महानुभाव,वारकरी या संप्रदायाचा मूलस्त्रोत नाथ संप्रदायच असल्याने थोड्याफार प्रमाणात नाथ संप्रदायाची तत्वे अंगिकारलेली दिसतात.मराठीची काव्यपरंपरा ज्ञानेश्वरापासून मानली जाते.ज्ञानेश्वरांनी उभारलेल्या भक्कम पायावरच मराठीची परंपरा उभी आहे.मराठीची थोरवी सांगताना ते म्हणतात की, ‘जैसी दिपामांझि दिवटी ! का तिथी माझि पूर्णिमा गोमटी ! तैसी भाषांमध्ये मऱ्हाटी ! सर्वोत्तम’ !! आणखी ते पुढे म्हणतात की, ‘माझा मराठाची बोलू कौतुके ! परि अमृतातेही पैजा जिंके !ऐसी अक्षरे रसिके !मेळवीन’! संत एकनाथांच्या काळात तर संस्कृत भाषेला फार महत्व आले होते.धर्मपंडित लोक प्राकृत भाषेस कमी लेखत होते. ‘संस्कृतवाणी देवे केली ! तरी प्राकृत काय चोरापासूनि झाली?’अशा प्रकारचा खडा सवाल एकनाथांनी त्याकाळी धर्माच्या ठेकेदारांना केला. संत एकनाथांनी प्रौढ मराठी बरोबरच लोकभाषेत भारुडे रचून मराठीला नवा डौल प्राप्त करून दिला.
            संत तुकाराम महाराजांनी तर मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर बसवलं.आपण जगावं कसं ?याचे बोधपर मार्गदर्शन त्यांनी आपल्या विचारातून दिले.काळाच्या ओघातही अखंड आणि चिरकाल टिकून राहील अशी साहित्य निर्मिती तुकाराम महाराजांनी मराठी भाषेत केली.मराठी भाषेत अनेक थोर रत्नांची खाण आढळते. अगदी वि.स.खांडेकर, पु,ल.देशपांडे, आचार्य अत्रे, कुसुमाग्रज, करंदीकर, भालचंद्र नेमाडे या आणि अशा अनेक साहित्यिकांची यादी देता येईल.या सर्वांनीच मराठी भाषेची सेवा केली आहे.
           आता प्रश्न येतो मराठी भाषा संवर्धनाचा. मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल,तिच्या टिकण्याबद्दल आपण साशंक का झालो आहोत? याला आपणच जबाबदार आहोत. आपण व्यवहारातून मराठी भाषा हद्दपार करण्याचा जणू चंगच बांधला आहे. रोजच्या जगण्यात मराठीचा वापर कमी-कमी होत चालला आहे.आपली मुलं इंग्रजी शाळेत जात असल्याने त्यांच्याशी तर मराठी बोलणे हद्दपारच झाले आहे. एवढंच काय इंग्रजी शाळेत मराठीचे शिक्षक/शिक्षिका हिंदी किंवा इंग्रजीतून मराठी शिकवताना आढळतात. अर्थात हा दोष शिक्षकाचा आहे असे मात्र नाही.विद्यार्थ्यांचे  मराठी शब्दज्ञान समृद्ध नसल्यामुळे त्याला मराठी शब्दाचा अर्थ समजून सांगण्यासाठी पर्यायी भाषेचा आधार घ्यावा लागतो.आपण तरी कुठे दैनदिन जीवनात आग्रहाने मराठीचा वापर करतो. समोरचा मराठी भाषिक असून,त्याला मराठी येत असून आपण त्याच्याशी  हिंदी किंवा इंग्रजीतून बोलतो.उदाहरणच द्यायचे तर रिक्षावाला, बाजारपेठ,बसस्थानक,रेल्वे स्टेशन,उपहारगृहे या ठिकाणी केलेला संवाद आठवावा. याचा अर्थ असा नाही की परकीय भाषा शिकू नये. परकीय भाषांचा आदर करत असतानाच मातृभाषेकडे मात्र दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी.
          मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल आपण सकारात्मक होणे गरजेचे आहे.मराठी भाषेला खच्ची करणाऱ्या नकारात्मक घटकांबद्दल जागरूक होणे आवश्यक आहे. आपल्याच राज्यात मराठीत बोलण्याचा संकोच,मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून शिक्षण देण्याचा वाढता कल,भाषेबद्दलचा अति आत्मविश्वास,परकीय व्यावसायिकांशी मराठीत बोलण्यास कुचराई,डिजिटल तंत्रज्ञान,महाजालातील जागतिक संगणकीय संवाद इ.ठिकाणी इंग्रजीचा वापर, मिश्र भाषांचा वापर अशा अनेक कारणांनी मराठी भाषा अडगळीस पडण्याची भीती निर्माण झाली आहे. 
                मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो? याचा विचार होणे गरजेचे आहे. सर्वप्रथम व्यवहारात जास्तीत जास्त प्रमाणात मराठी भाषेचा वापर व्हायला हवा.उच्च्य शिक्षण मराठीतून उपलब्ध करून द्यावे. लहान वयापासून मराठी भाषा अंगवळणी पडली असल्याने मराठीतून विचार व्यक्त करणे सोपे जाते.शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषा असणे अत्यंत गरजेचे आहे. मातृभाषा ही  ज्ञानभाषा झाली तर शिक्षण सोपे होईल.त्याचबरोबर मराठी लेखकाने आणि साहित्याने आपली भाषा टिकवण्याची व वाढविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. शासन स्तरावर मराठी भाषा संवर्धनासाठी आणखी उपक्रम वाढवण्याची गरज आहे. थोडक्यात काय तर मराठीचे जास्तीत जास्त उपयोजन कसे करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
                मराठी भाषेची आधी संस्कृतकडून आणि आता इंग्रजीकडून होत असलेली गळचेपी मराठीचे पाईक म्हणून सर्वांनाच टोचते आहे.मराठीच्या जन्मापासूनच मराठी साहित्यिकांनी भाषा सेवेचे व्रत हाती घेतले आहे. भाषा संवर्धनाचा लढा अखंड चालू आहे. मराठी भाषा लढली पण अस्ताला गेली नाही. पुढेही आपल्या अस्तित्वासाठी ती अशीच लढणार आहे.ज्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो त्यांनी म्हटले आहे की,’भाषा मरता देश ही मरतो,संस्कृतीचाही दिवा विझे! गुलाम भाषिक होऊन अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका!!’  जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने तिच्या अस्तित्वाच्या लढाईला थोडे बळ देण्याचा आपण संकल्प करूया !